Socio-Architectural Blog

Friday, September 22, 2006

सामाजिक क्रांतिकारक

स्वातंत्र्य मिळून तब्बल ५९ वर्ष उलटली. पण आपल्यात काहिच बदल नाही झाला. अजूनही मानसिकता विज्ञाननिष्ठ नसून कुठल्या तरी धर्म, शास्त्र, श्रद्धा अणि पर्यायाने कर्म करण्याची भिती यातच अडकली आहे. सतत कुठल्या न कुठल्या रीती चालिंची ग्वाही देत पळवाट शोधत असते. समाज हा नेहमीच सुधारणेच्या बाबतीत तठस्थ राहत आला आहे. पुरुष-प्रधान विचारसरणी नेहमी त्याचा दृष्टिकोन ठरवत गेली. खूप कमी लोक अशी होऊन गेली की ज्यांनी हा सामाजाचा ताठरपणा मोडून त्याला या सर्व जाणीवपूर्वक दुर्लक्षिलेल्या प्रश्णांकडे गांभीर्याने बघायला लावले. कहींना समाजास झुकवणे जमले, पण बरेचसे स्वत: मोडून गेले पण तरिही त्यांनी कार्य कधी सोडले नाही.
गेल्या आठवड्यात अश्याच विषयांवर कही चित्रपट "सलग" बघायला मिळाले हा एक योगायोगच म्हणावा, त्यात हातभार घालायला सोबत काही पुस्तके पण होतीच.
प्रथम "रामशास्त्री", प्रभात फिल्म कं. ने सन १९४४ साली हा चित्रपट बनवला. प्रमुख भूमिका ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक- श्री. गजानन जहागीरदार ह्यांनी जीवंत केली होती. हा चित्रपट मी खरतर आधी अनेक वेळेला बघितला होता, पण कधी रामशास्त्र्यांची निस्पृह न्यायशीलता, कधी जहागिरदारांचा, ललिता पवारांचा अभिनय तर कधी प्रभातचे चित्रपट बनवण्याचे कसब, हेच लक्षात रहायचे. परवा बघताना एक खूपच वेगळा विचार समोर आला.
रामशास्त्री ह्यांची समाजा विषयची दृष्टी खूपच मानवतावादी होती. त्यांना हे कळत होते की समाज सुधारल्याशिवाय सुराज्य संभव नाही. एका प्रसंगात, एका दासीच्या लग्नाची फ़िर्याद माधवराव पेशव्यांसमोर येते तेव्हा कुठल्या तरी शास्त्राचा(?) आधार घेऊन फ़िर्यादी दासीचे लग्न अवैध ठरवतो तेव्हा रामशास्त्री पेशव्यांना ठणकवून सांगतात की माणसाची विक्री योग्य ठरवणारे ते शास्त्रच चूक आहे. त्यामुळे जरका दासीची विक्रीच मानवतेच्या विरोधात तर तिचे लग्न चूक ठरवणारे शास्त्र बदलणे भाग आहे. हा कालखंड १७५०-६० च्या सुमारचा आहे. त्यावेळेस राज्यपदी माधवरावांसारखा द्रष्टा माणुस बसला होता म्हणून त्यांनी योग्य त्या सुधारणा केल्या. रामशास्त्र्यांना खंबीर राजाची साथ मिळाली म्हणून अशा प्रथा बंद पडल्या. बाकिचे तर आपल्याला महीतच आहे. काही बाबतीत इंग्रजांना मानायला पहिजे. राजा राममोहन रॉय ह्यांच्या प्रयत्नांना फळ त्यांनीच मिळवून दिले, सती प्रथा ही आपल्या समाजाची एका स्त्री कडे बघण्याची दृष्टी दाखवते, ती त्यांनी कायद्याने बंद पाडली. पुढिल चित्रपट असाच माझ्या मनामध्ये उलट-सुलट विचारांचे जाळे विणत गेला. त्यामध्ये असणारे शास्त्राचे(?) प्रयोजन मलातरी विचलित करून गेले. इतके की माझ्यासाठी बाकीचा चित्रपट निरर्थक राहिला. "२२ जून १८९७" हे त्या चित्रपटाचे नाव. नचिकेत व जयू पटवर्धन ह्यांनी हा चित्रपट बनविला आहे. त्यामध्ये प्रभाकर पाटणकर, रवींद्र मंकणी, सदाशिव आमरापूरकर ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. मला दिग्दर्शकाचा दृष्टीकोन नक्की काय आहे हेच नाही कळत, मलातरी तो थोडासा गोंधळलेला वाटतो.
ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीची आहे. तेव्हा झालेल्या कथित अत्त्याचारांचा बदला म्हणून चापेकर बंधू हे रॅंड नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध करतात. चित्रपटामध्ये दाखवलेले अत्याचार मला तरी इतके भीषण नाही वाटले. मला खरे काय झाले माहीत नाही पण चित्रपटाने माझ्यासमोर पुरेसे चित्रच उभे नाही केले. वारंवार एकाच गोष्टी वर राग व्यक्त केला गेला, की रॅंड च्या आदेशावरून प्रत्येकाचे घर मग तो भलेही ब्राह्मण असो वा क्षूद्र(?) सैनिकांकरवी पूर्णपणे निर्जंतुक करून घेतले. चापेकरांचे घर सुद्धा अशाच प्रकारे साफ करून घेतले गेले. त्यांना मुख्य राग हा, की खालच्या(?) जातीच्या माणसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढलं आणी ज्यांनी विरोध केला त्यांना बळ वापरून बाहेर काढले, विटाळ केला, त्यांचे देव देखील "निर्जंतुक" केले. माझ्या मते हा काही असा गुन्हा नाही की त्याबद्दल कोणाचा वध करावा. खरतर मला तरी अस वाटल की चित्रपट इथे बराच कमी पडला. चित्रपटात एक दृष्य आहे, त्यामध्ये हे चापेकर बंधू एका लग्नाला उपस्थित न रहाण्याचे कारण हे त्या वधुचे वय "शास्त्रा" बाहेर असल्याचे कारण देतात. ते म्हणतात की ती मुलगी ही १३ वर्षांपेक्षा मोठी असल्यामुळे तिचे लग्न हे अ-शास्त्रीय होते. मुख्य म्हणजे मला त्यांचा दृष्टिकोन बराच चुकीचा व बुरसटलेला वाटला, सुधारणेच्या विरुद्ध वाटला. खरतर रॅंड साहेबाने अशा कडक उपायांमुळेच प्लेग सारख्या महामारीवर नियंत्रण मिळवलेले होते. त्यातून शिकायचे सोडून हे काय भलतेच डोक्यात भरले!! त्यावेळेपर्यंत खरतर सामाजिक सुधारणेचे उपाय सुरू झले होते. बरेच जण प्रयत्न करत होते, जसे महात्मा फुले, आगरकर, वगैरे वगैरे... त्या लोकांमध्ये एक वेगळीच धडाडी होती. विचित्र, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आणि मुख्यम्हणजे मानापमानाच्या, आत्मस्तुतीच्या व स्वताःच्या अहंकारासाठी स्त्रीचे अस्तित्व नाकारणारया समाजापुढे खंबीरपणे उभे राहून त्याला त्याची चूक दाखवून द्यायची छाती त्यांच्यापाशी होती. समाजाकडून असह्य त्रास झाला, पण ही माणसं आपापलं हाती घेतलेले काम करीत राहिली.
त्याच काळात अजून एक महात्मा (खरतरं महर्षी) असाच समाजानी उपेक्षिलेल्या प्रश्णावर कार्य करत होता, नव्हे स्वतःहून त्यावरती आचरण देखील करत होता. तो प्रश्न होता विधवांच्या भविष्याचा. आणि तो महामानव म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. "शास्त्राने" केवळ अशक्य असणारया विधवेच्या पुनर्विवाहासाठी बळ म्हणून स्वतःहून प्रथम एका विधवेशी विवाह केला. हा काळ देखील चापेकर बंधूंचाच आहे, पण विरोधाभास बघा. कर्व्यांचे विचार हे खरे क्रांतिकारी होते. त्यांनी एका स्त्रीचे समाजातील स्थान हे पुरुषाच्या बरोबरीचे आहे हे जाणले होते.. जरका एका विधुराला परत लग्न करता येते तर एका विधवेला तो हक्क का नसावा?? तिला देखील काही शारिरीक सुखाच्या भवना असतात हे त्यानी जाणले होते. त्यांनी अशा शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी एक शिक्षणसंस्था व रहाण्यासाठी एक आश्रम हिंगणे येथे काढला.
बरेच वेळेला असे होते की एखाद्या महात्मा माणसाचे कार्य इहलोकातून त्याच्या बरोबरच जाते, पण अशी काही उदाहरणे आहेत की जेथे एका माणसचे महान कार्य त्याच्या पुढील पिढ्या तेवढ्याच सक्षम पणे पुढे वाढवतत. नावच घ्यायचे तर बाबा आमट्यांपेक्षा अजून चपखल उदाहरण नाही सापडत.(सध्या त्यांची तिसरी पिढी त्याच कामात झटून काम करत आहे)
अशाच एका थोर व स्वाभाविकपणे उपेक्षिलेल्या एका "सामाजिक क्रांतिकारकावर" अमोल पालेकरांनी एक अत्युत्तम चित्रपट बनवला आहे- ध्यासपर्व. रघुनाथ धोंडो कर्वे, हे त्यांचे नाव. ह्यामध्ये त्यांची मध्यवर्ती भुमिका किशोर कदम ( कवी सौमित्र) ह्यांनी अत्यंत जीव ओतून केली आहे. त्यांच्या पत्नीच्या (मालतीबाई कर्वे)भूमिकेत सीमा बिस्वास ह्या अक्षरशः जगल्या आहेत. बाकीची पात्र ही जाणीवपूर्वक सहायक व छोटी ठेवली आहेत. कुठेही मुख्य विषयापासून चित्रपट भरकटलेला नाही. अशा विषयावर ह्या आधुनिक युगात साधा चित्रपट काढताना/बघताना इतका त्रास/संकोचल्यासारखे होते तर त्या काळात तसे काम करताना काय काय सहन करावे लागले असेल हे जाणवते. हा समाज, एका स्त्रीने साधे शिक्षण घेण्या-देण्या वरून महात्मा फुले व सावित्रीबाईंना इतका त्रास देऊ शकतो तर ह्यांचा विषय त्यांना पचणे शक्यच नव्हते.
लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादना साठी नसून सुखासाठी देखील असतो. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरं व्हायची, त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती देखील खालावयाची. खूप मुले झाल्यामुळे शारिरीक सुखाची भिती वाटायला लागायची, अशा भितीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अश्या गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बरेच रोग व्याधी निरोगी घरामध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्येमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला. एक सोप्पा उपाय त्यांना सापडला- संततीनियमन. फ्रांस येथील वास्तव्यामध्ये त्यांनी त्यासंदर्भात बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून नियमनाची साधनं व पुस्तकं घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संतती नियमन् केंद्र चलू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रीयांना देखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना नाही पचले, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. भारतच्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी सध्या संतती नियमन करीत असावीत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरी देखील ते केवळ स्वताःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्नीने, व आई-वडिलांनी(धोंडो केशव कर्वे) पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रॅंगलर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला तेव्हा त्यांची केस बाबासाहेब अंबेडकरांनी लढवली होती. त्यामुळे जरी ते केस हरले असले तरी त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.
अशी ही तीन माणसे अणि त्यांच्या वर बनलेले हे तीन चित्रपट, एक वेगळाच विचार करायला लावतात. नेहमीच्या साचेबंद आयुष्यात/समाजात आपली भुमिका नक्की काय आहे असा प्रश्ण उपस्थित करतात. असे काही चित्रपट सर्वांनी बघावे असे वाटते.
-- शिरीष माधव गानू
२२/०९/०६ ते १२/१०/०६